तहसिल कार्यालयात सुविधा, बॅनरवरील निर्बंधाचीही मागणी
चंद्रपूर:- आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंडातून अर्थसहाय्य करावे, तसेच वरोरा तालुक्यातील विविध कोलमाईन्स, वर्धा पॉवर, जी.एम.आर. स्टील प्लँट यांसारख्या कंपन्यांना तालुक्याच्या विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना CSR फंड देण्याचे आदेश द्यावेत, अशा प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) महिला आघाडी वैद्यकीय कक्षाचे जिल्हा प्रमुख सौ. योगिता जगदीश लांडगे यांनी आज ०९/१०/२०२५ चंद्रपूर जिल्हाधिकारी साहेब यांना सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनात महिलांच्या रोजगारासह कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार समिती बाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
∆ शेतकऱ्यांना अर्थसहाय्य: आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कंपन्यांच्या CSR फंडातून तातडीने अर्थ सहाय्य उपलब्ध करून द्यावे.
∆ स्थानिक विकासासाठी CSR फंड: वरोरा तालुक्यातील विविध कोलमाईन्स आणि उद्योगांना, तालुक्याच्या विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना CSR फंड देण्यास आदेशित करावे.
∆ महिलांना रोजगारात प्राधान्य: कंपन्यांमध्ये महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य मिळावे.
∆ लैंगिक छळ समितीची पडताळणी: खाजगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक समिती कार्यरत आणि प्रशिक्षित आहे की नाही, तसेच त्यात स्थानिक एन.जी.ओ. (NGO) प्रतिनिधी आहे काय, याची पडताळणी करून ती कार्यरत ठेवण्याचे आदेश द्यावेत.
∆ जड वाहतुकीवर निर्बंध: वरोरा शहर आणि ग्रामीण भागातून होणाऱ्या विविध कंपन्यांच्या जड वाहतुकीवर निर्बंध घालावे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षितता मिळेल.
सुरक्षितता आणि सुविधा:
वरोरा शहरातील धोकादायक मोठे बॅनर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणीचे ठरू नयेत, यासाठी नगर पालिकेला आदेशित करावे.
वरोरा येथील तहसिल कार्यालयामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, शौचालय आणि स्वच्छतागृहाची सोय करण्याकरिता आदेश द्यावेत.
वरोरा, भद्रावती तालुक्यातील विविध कंपन्यांसोबत महिलांची एक बैठक बोलावून महिलांना काम करण्याची संधी देण्यावर प्राधान्य द्यावे.
आंदोलनाचा इशारा:
या मागण्यांवर आठ दिवसांत योग्य तोडगा न निघाल्यास, शिवसेना महिला आघाडी वैद्यकीय कक्ष लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा सौ. योगिता लांडगे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना दिला आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला योगिता लांडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी वैद्यकीय कक्ष चंद्रपूर, माया पेंदोर शिवसेना आदिवासी जिल्हा समन्वयक, मनिषा लोनगाडगे शिवसेना माजी तालुका प्रमुख उपस्थित होते.