Pombhurna News: पोंभुर्णा पंचायत समिती सदस्यपदाचे आरक्षण सोडतीची तारीख जाहीर!

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या पार्श्वभूमीवर पोंभुर्णा पंचायत समितीच्या निर्वाचक गणाचे सदस्य पदासाठी आरक्षण सोडत पध्दतीने काढून जागा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी पोंभुर्णा येथे १३ ऑक्टोंबर, २०२५ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम ९ (१), महाराष्ट्र जिल्हा परिषद (निवडणूक विभाग व निवडणूक घेण्याबाबत) नियम १९६२ नियम २ (अ) आणि विशेषतः 'महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम २०२५' तसेच विविध न्यायालयीन निर्णयांच्या अनुषंगाने ही आरक्षणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.


या प्रक्रियेअंतर्गत पोंभुर्णा पंचायत समिती क्षेत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) तसेच या सर्व प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणासह जागा निश्चित केल्या जाणार आहेत. पोंभुर्णा पंचायत समिती निर्वाचक गणाचे सदस्य पदासाठी आरक्षण सोडत काढण्यासाठीची ही विशेष सभा दिनांक १३ ऑक्टोंबर, २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पंचायत समिती सभागृह, पोंभुर्णा येथे आयोजित करण्यात आली आहे.


प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार, पोंभुर्णा, मोहनिश शैलवटकर यांनी पोंभुर्णा तालुक्यातील सर्व नागरिक आणि मतदारांना या आरक्षण सोडतीच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाईल.