Shivsena (UBT) Movement : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक; चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र, राज्य शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांच्या नेतृत्त्वात बुधवार (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. 


चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. पीकविमा योजनेतील एकल ट्रिगर बंद करून पूर्वीप्रमाणे योजना लागू करावी. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर करावे. अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या गुरांचा तत्काळ मोबदला द्यावा. कापसाला प्रती क्विंटल १५ हजार रुपये आणि सोयाबीनला १० हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.


जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज अडचणीत आहे. मात्र, राज्यातील सरकार बळीराजाला आर्थिक मदत करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मंजूर होणार नाही, तोपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांनी सांगितले.