Accident News: पर्यटनासाठी निघालेल्या 'त्या' सहाही युवकांवर काळाचा घाला

Bhairav Diwase
पुणे:- पुण्यातील कोपरे उत्तमनगर येथे राहणारे सहा तरुण नवी कोरी थार गाडी घेऊन कोकणात पर्यटनासाठी निघाले होते. मात्र दिवेआगरला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. ज्यात या सहाही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तीन दिवसांच्या सहलीचे नियोजन करून वीस दिवसांपूर्वी खरेदी केलेली नवी कोरी थार गाडी घेऊन हे सर्वजण प्रवासाला निघाले. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे जाण्यासाठी निघाले होते. पुण्यातून ताम्हिणी घाट मार्गे माणगाव आणि माणगाव येथून दिवेआगरला पोहचणे अपेक्षित होते. मात्र ताम्हिणी घाटात सणसवाडी गावच्या हद्दीत एका तीव्र वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी ५०० मीटर खोल दरीत जाऊन कोसळली. हा अपघात इतका भिषण होता की नव्या कोऱ्या थार गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि गाडीतील सर्वांचा जागीच मृत्यू झाला.

१८ नोव्हेंबर रोजी रात्री १२ साडेबारा वाजेपर्यंत सर्वांचे फोन लागत होते. मात्र नंतर सर्वांचे फोन अचानक लागणे बंद झाले. त्यामुळे मुलांच्या नातेवाईकांना चिंता वाटू लागली. त्यामुळे १८ नोव्हेंबरला त्यांचे काही मित्र आणि नातलग मुलांचा शोध घेण्यासाठी दिवेआगरच्या दिशेने निघाले. त्यांनी संपूर्ण ताम्हिणी घाट पालथा घातला. दिवेआगर येथे जाऊन लॉजेस आणि हॉटेल्समध्ये जाऊन मुलांची विचारणा केली. मात्र सहाही जणांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्यात जाऊन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पुणे पोलीसांनी या घटनेची वर्दी रायगड पोलिसांना दिली. त्यानंतर रायगड पोलीसांनी मुलांचा शोध सुरू केला.

अपघातग्रस्त गाडीतील मुलांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांचे लोकेशन ट्रेस केले गेले. यात ताम्हिणी घाटात सर्वांचे फोन लोकेशन शेवटचे ट्रेस झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने या परिसरात शोध मोहीम सुरू केली. गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त वाहन सणसवाडी येथील दरीत साधारपणे पाचशे फूटावर झुडपात पडली असल्याचे आढळून आले. मात्र तोवर अपघातग्रस्त वाहनातील सहाही तरुण मुलांचा मृत्यू झाला होता. साहील बोठे, प्रथम चव्हाण, पुनित शेट्टी, ओंकार कोळी, शिवा माने आणि महादेव कोळी अशी मृत तरूणांची नावे आहेत.

गुरुवारी सकाळी अपघातग्रस्त वाहन सणसवाडी येथील दरीत साधारपणे पाचशे फूटावर झुडपात पडली असल्याचे आढळून आले. खोल दरीत ही दुर्घटना घडली असल्याने मृतदेह बाहेर काढणे हे पोलीस यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे पुण्यातून रेस्क्यु चॅरीटेबल ट्रस्ट, माणगाव येथून शेलार मामा रेस्क्यू टीम, एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम कोलाड आणि साळुंखे रेस्क्यु टीम महाड यांच्या पथकांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले. या पथकाने अथक प्रयत्न करून मृतदेह वर काढले. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी चार वाजता पूर्ण झाली. यानंतर सर्व अपघातग्रस्तांचे मृतदेह माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतक ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवृत्ती बोऱ्हाडे यांचे पथक या अपघाताचा पुढील तपास करत आहे.