
कोल्हापूर:- कोल्हापुरातून सैन्य भरतीची परीक्षा देऊन घरी परतत असताना आंबर्डेच्या दोन तरुणांचा भाडळे खिंडीत अपघाती मृत्यू झाला. पारस आनंदा परीट (वय 21) व सुरज ज्ञानदेव उंड्रीकर (21) अशी त्यांची नावे आहेत. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून रात्री उशिरापर्यंत मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी सुरू होती.
सुरज आणि पारस यांनी काही महिन्यांपासून सैन्य भरतीसाठी सराव सुरू केला होता. लष्करात भरती होवून देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. शनिवारी दुचाकीवरून दोघे कोल्हापूरला गेले होते. रविवारी मुख्य परीक्षा झाल्यावर सायंकाळी सहा वाजता दोघेही यशाची स्वप्ने घेवून आनंदाने गावी परतत होते. दरम्यान सायंकाळी साडेसात वाजता भाडळे खिंडीतील वळणावरुन जात असतांना हातकणंगले येथून ऊस वाहतूक करणार्या ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. डोक्याला जबर मार बसल्याने सूरज आणि पारस यांचा जागीच मूत्यू झाला.
अपघातानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्याच वेळी बांबवडेचे उपनिरीक्षक शिरसाट व महामार्ग पोलीस दाखल झाले. त्यांनी मलकापूर रुग्णालयात मृतदेह दाखल केले. आपल्या गावचे दोन तरुण अपघातात ठार झाल्याचे समजताच आंबर्डे गावावर शोककळा पसरली. याप्रकरणी फरार ट्रक चालकाचा शोध सुरू असून बांबवडे चौकीत अपघाताची नोंद झाली आहे.
आंबार्डेला सैन्य भरतीची परंपरा
आबार्डे गावास सैन्य भरतीची मोठी परंपरा आहे त्यामुळे गावात घरोघरी भरती साठी प्रयत्न करणारे तरुण आहेत. सैन्य भरतीचे स्वप्न उराशी घेऊन सूरज आणि पारस हे जिवलग मित्र प्रयत्न करत होते. परंतू या अपघाताने त्यांचे स्वप्न अधूरेच राहिले.

