Chandrapur News: 'टाइम इज मनी'चा धडा; चंद्रपुरात खळबळ!

Bhairav Diwase
आयुक्तांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी थेट महानगरपालिकेचे प्रवेशद्वार केले बंद!

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेत आज सकाळी एक अत्यंत कडक शिस्त लावण्याचा प्रकार पाहायला मिळाला. नवनियुक्त आणि धडाकेबाज आयएएस अधिकारी, आयुक्त अकुनुरी नरेश यांनी पदभार स्वीकारताच कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आपली वक्रदृष्टी फिरवली आहे.

महानगरपालिकेची अधिकृत कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असताना, आयुक्त अकनुरी नरेश हे १० वाजता कार्यालयात दाखल झाले. मात्र, त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, कार्यालयातील अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते. कार्यालयीन वेळेचं हे सर्रास उल्लंघन पाहून आयुक्त चांगलेच संतप्त झाले. त्यांनी लागलीच, कोणताही विलंब न करता, महानगरपालिकेचे मुख्य प्रवेशद्वार तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले.


काही वेळाने, जे अधिकारी आणि कर्मचारी नेहमीप्रमाणे उशिराने कार्यालयात पोहोचले, त्यांना प्रवेशद्वारावरच मोठा धक्का बसला. महानगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद पाहून त्यांची एकच धावपळ उडाली आणि बघता बघता प्रवेशद्वारासमोर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी जमली.


नवनियुक्त आयुक्तांनी दिलेल्या या अचानक आणि कठोर धक्क्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कामाच्या वेळेवर गांभीर्याने लक्ष देऊन, प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्याचा आयुक्तांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांची कामे वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत, यासाठी आयुक्त अकुनुरी नरेश यांनी ही 'ऑपरेशन क्लोज गेट' मोहीम राबवली असल्याची चर्चा आहे.