Chandrapur News: सावकारी जाचाला कंटाळून किडनीची विक्री

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी पोलिसांनी ५ सावकारांना केले जेरबंद


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सावकारी पाशात अडकलेल्या एका तरुणाला कर्जाची परतफेड करण्यासाठी चक्क स्वतःची किडनी विकावी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १ लाख रुपयांच्या कर्जापोटी तब्बल ४८ लाख रुपये देऊनही सावकारांची हाव न संपल्याने या तरुणावर ही वेळ आली. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे.


नागभीड तालुक्यातील एका ३६ वर्षीय तरुणाने फेब्रुवारी २०२१ मध्ये ब्रम्हपुरी येथील एका सावकाराकडून १ लाख रुपये व्याजाने घेतले होते. यापैकी १५ हजार रुपये त्याने परत केले, मात्र उर्वरित रकमेसाठी त्याने मुदतवाढ मागितली. यावेळी सावकाराने २० टक्के व्याज आणि प्रतिदिन ५ हजार रुपये पेनाल्टी लावण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून या तरुणाने इतर सावकारांकडून पैसे घेतले. अशा प्रकारे चक्रव्यूहात अडकलेल्या या तरुणाने आतापर्यंत ४८ लाख ५३ हजार रुपये सावकारांना दिले. ही अव्वाच्या सव्वा रक्कम उभी करण्यासाठी या तरुणाला कंबोडिया देशात जाऊन स्वतःची किडनी विकावी लागली.

पोलिस कारवाई:

फिर्यादीच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये:
१) मनिष घाटबांधे, २) किशोर बावनकुळे, ३) लक्ष्मण उरकुडे, ४) प्रदिप बावणकुळे, ५) संजय बल्लारपुरे, ६) सत्यवान बोरकर यांच्यावर अपराध क्रमांक ६५४/२०२५ कलम ३८७, ३४२, २९४, ५०६, १२० (ब), ३२६ भादंवि आणि कलम ३९, ४४ महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ५ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांचे आवाहन:

चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणी अवैध सावकार अशा प्रकारे तुमची आर्थिक किंवा शारीरिक छळवणूक करत असेल, तर त्वरित ११२ किंवा ७८८७८९०१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.