चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. संपत्तीच्या वादाने एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा भयानक अंत केला आहे. भद्रावती शहरात राहणाऱ्या सूरज भोंडे या २८ वर्षीय तरुणाने आपल्या सख्या बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. या रक्ताळलेल्या खेळात मदतीला धावलेली आईदेखील गंभीर जखमी झाली असून, सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भद्रावती येथील भोंडे कुटुंबात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपत्तीवरून कडाक्याचे वाद सुरू होते. वाद इतका विकोपाला गेला होता की, आई पुष्पा भोंडे आणि बहीण संजीवनी हे वेगळे राहत होते, तर आरोपी सूरज आणि त्याचे वडील स्वतंत्र राहत होते.
या वादाचा भयंकर स्फोट झाला. रागाच्या भरात सूरजने ३२ वर्षीय बहीण संजीवनीवर धारदार शस्त्राने वार केले. यात संजीवनीचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या ५८ वर्षीय आईवरही सूरजने हल्ला चढवला, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी सूरज भोंडे याला बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणात वडिलांचा काय सहभाग आहे, हे तपासण्यासाठी त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

