चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे अॅड. विजय एस. सकदेव व अॅड. दिवाकर एन. बुरीले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरटीफिसीयल इंटेलिजन्स (Artificial Intelligence – AI) या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र कलींगा विद्यापीठ, नवा रायपूर (छत्तीसगड) आणि चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रम उद्या दि. १३ मार्च २०२६ रोजी दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या रूम क्रमांक १२ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या चर्चासत्रात आजच्या डिजिटल युगात वेगाने विकसित होत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानाचा कायदेविषयक क्षेत्रात कसा प्रभावी वापर होऊ शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
विशेषतः कायदेशीर संशोधन (Legal Research) केस अॅनालिसिस, दस्तऐवज अभ्यास तसेच न्यायालयीन प्रक्रियेत AI ची भूमिका कशी उपयुक्त आणि प्रभावी ठरू शकते यावर या सत्रात चर्चा करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वकिलांना जलद व अचूक माहिती मिळण्यास मदत होते. तसेच न्यायालयीन कामकाज अधिक कार्यक्षम होण्यास हातभार लागतो. या दृष्टीने हे सत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कायदे व्यवसायात तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता वकिलांनी नवीन तांत्रिक साधनांची माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येत असलेले हे चर्चासत्र वकिलांसाठी मार्गदर्शक व ज्ञानवर्धक ठरेल. असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी या उपयुक्त चर्चासत्राला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

