दाताळा–देवाळा व दाताळा–कोसारा मार्गावर स्ट्रीट लाईटची नागरिकांची मागणी
चंद्रपूर:- ( राहुल थोरात ) शहरालगत असलेल्या राम सेतू पुलिया परिसरानंतर दाताळा ते देवाळा तसेच दाताळा ते कोसारा या मार्गावर सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले असून रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर विद्युत खांब व प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर मार्गावर अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच कामानिमित्त ये-जा करणारे वाहनचालक दररोज प्रवास करतात. मात्र रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाडी असल्यामुळे अंधार अधिक गडद जाणवतो. त्यामुळे विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना रात्री प्रवास करताना भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की या मार्गावर अद्यापही पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे अनेकदा वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जाते. यामुळे लहान-मोठे अपघात होण्याची भीती कायम आहे. तसेच अंधाराचा फायदा घेत काही अनुचित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाकडे दाताळा ते देवाळा आणि दाताळा ते कोसारा मार्गावर तातडीने विद्युत खांब उभारून स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी केली आहे. या भागात योग्य प्रकाश व्यवस्था केल्यास नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करणे शक्य होईल तसेच परिसरातील भीतीचे वातावरणही कमी होईल. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

