Chandrapur News: चंद्रपुरात १२ मार्चला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके जयंती व आदिवासी लोककला महोत्सव

Bhairav Diwase
चंद्रपूर:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांची जयंती, आदिवासी मेळावा तसेच भव्य ‘आदिवासी लोककला महोत्सव’ गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता वीर बाबूराव शेडमाके शहीद स्मारक (मध्यवर्ती कारागृह परिसर), गिरणार चौक, चंद्रपूर येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने या महोत्सवात पारंपरिक आदिवासी लोककला आणि वाद्यांचे सादरीकरण होणार आहे. यानिमित्ताने लोककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून विविध आदिवासी पथके आपल्या पारंपरिक कला सादर करणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या पथकांना आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यात प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ४० हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक ३० हजार रुपये असेल. तसेच १० हजार रुपयांची दोन प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी पथकास ५ हजार रुपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवात प्रवेश विनामूल्य असून जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी व नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर विकास राचेलवार यांनी केले आहे.