चंद्रपूर:- विदर्भाच्या विकासाचा ध्यास मनात बाळगून शिक्षण, संस्कार आणि संधी यांचा संगम घडवणारे नेतृत्व म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार. त्यांच्या अथक प्रयत्नांतून आणि दूरदृष्टीतून चंद्रपूर जिल्ह्यात उभा राहत असलेला शैक्षणिक परिवर्तनाचा नवा अध्याय आज संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. याच कार्याची दखल घेत राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठातर्फे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे उभारण्यात आलेल्या नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. नारनवरे यांनी सांगितले की, मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य आ. मुनगंटीवार यांनी आपल्या जिद्दीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य केले. गोंडराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या चंद्रपूरने संस्कृतीचे धडे अनेक राज्याला दिले. अशा ऐतिहासिक क्षेत्राला वैभव मिळवून देण्याचे कार्य सुरू असून, शिक्षणासोबत संस्कृतीचे धडे देणारे हे केंद्र भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही आ. मुनगंटीवार यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. महर्षी कर्वे यांच्या विचारांनी प्रेरित या एसएनडीटी विद्यापीठाचा विस्तार करताना आ. मुनगंटीवार यांनी एका खऱ्या जननायकाची भूमिका निभावली असून, त्यांच्या नेतृत्वात विसापूर येथील हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे ‘गुरुकुलम’ आणि ज्ञान-ध्यानाचे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात एक नवा सुवर्ण अध्याय लिहिला जात आहे. विसापूर येथे उभारले जाणारे एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे हे भव्य उपकेंद्र केवळ एक शैक्षणिक संस्था नसून, महिलांच्या सक्षमीकरणाचे भक्कम व्यासपीठ ठरणार आहे. तब्बल ६२ विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांद्वारे महिलांना रोजगाराभिमुख शिक्षण देत स्वावलंबनाकडे वाटचाल घडविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.
सैनिकी स्कूल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी उभारलेले अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र यांसारख्या प्रकल्पांमुळे आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याला शिक्षणाच्या ‘हब’मध्ये रूपांतरित केले आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून विकास साधणारे हे नेतृत्व आज चंद्रपूरच्या प्रगतीचा वेग वाढवत असून, त्यांच्या कार्यामुळे जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे, हे विशेष.

