Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६: विकासाचा महामार्ग की आकड्यांची भूलथाप?

Bhairav Diwase
सत्ताधारी आणि विरोधकांची प्रतिक्रिया!

चंद्रपूर:- आज विधानसभेत राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर झाला. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पाने राजकारणात चर्चांचे वादळ उठवले आहे. कुणी याला 'विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप' म्हणत आहे, तर कुणी 'कंत्राटदारांचे बजेट' म्हणून टीका करत आहे.


अर्थसंकल्प सादर होताच माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याचे जोरदार स्वागत केले. "पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' या धोरणाचे हे प्रतिबिंब आहे," असे म्हणत त्यांनी बल्लारपूर येथे होणाऱ्या 'टिंबर म्युझियम' (झायलेरियम) च्या घोषणेबद्दल आनंद व्यक्त केला. यामुळे चंद्रपूरच्या सागवानाला जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


दुसरीकडे, विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी याला 'MMRDA चा अर्थसंकल्प' संबोधले. "आज लग्न लावले असून अपत्य २०४७ मध्ये होईल, अशी ही अवस्था आहे," असा टोला त्यांनी लगावला. राज्यावर वाढत्या कर्जाच्या डोंगरावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.


शेतकरी कर्जमाफीवरूनही वातावरण तापले आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजने'चे स्वागत केले असून, याला ग्रामीण अर्थव्यवस्थेची नवी पहाट म्हटले आहे. मात्र, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ही केवळ 'जखमेवर मीठ' चोळण्याचा प्रकार असल्याचे म्हटले असून, सातबारा पूर्ण कोरा करण्याची मागणी केली आहे.


आदिवासी विकास मंत्री, चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या २१,७२३ कोटींच्या तरतुदीचे कौतुक केले. मात्र, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण क्षेत्राकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन देऊन मराठी शाळांना वाऱ्यावर सोडल्याची टीका त्यांनी केली.


 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प हा '२०४७ च्या विकसित महाराष्ट्राचा' दूरदृष्टीपूर्ण रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल," अशा शब्दांत आ. किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.


एकूणच, हा अर्थसंकल्प उद्योगांना गती देणारा ठरेल की सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडेल, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी या आकड्यांच्या खेळात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.