चंद्रपूर:- भाजपला आज अंतर्गत गटबाजीमुळे नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला आहे. आमदार किशोर जोरगेवार आणि राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातील संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून, याचा थेट फायदा काँग्रेसला मिळाला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या झोन १ मधून भाजपाचे नगरसेवक रवी लोणकर विजयी झाले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी काँग्रेसच्या संगीता भोयर यांनी अनपेक्षित विजय मिळवला आहे. १२ सदस्यीय या समितीत भाजप आणि काँग्रेसकडे प्रत्येकी ६-६ असे समसमान संख्याबळ होते. मात्र, ऐन मतदानाच्या वेळी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका डीलन केळझरकर अनुपस्थित राहिल्या. परिणामी, भाजपच्या उमेदवार सुनीता जयस्वाल यांचा ५ विरुद्ध ६ मतांनी पराभव झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, केळझरकर यांना सभापती पदाचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र मुनगंटीवार गटाच्या जयस्वाल यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी मतदानाकडे पाठ फिरवली.
धक्कादायक बाब म्हणजे, झोन क्रमांक २ आणि ३ च्या निवडणुकीत भाजपने चक्क मैदानातून पळ काढला. झोन क्रमांक २ मधून भाजपच्या ज्योती जीवने आणि झोन क्रमांक ३ मधून जितेश कुळमेथे यांनी आपले उमेदवारी अर्ज अचानक मागे घेतले. विशेष म्हणजे, झोन ३ मध्ये भाजपकडे १३ विरुद्ध १० असे स्पष्ट बहुमत होते.
भाजप प्रदेश कार्यालयाकडून पाठवण्यात आलेली नावे केवळ सुधीर मुनगंटीवार समर्थकांची होती. यात रवी लोणकर आणि सुनीता जयस्वाल यांचा समावेश होता. जोरगेवार गटाच्या एकाही नगरसेवकाला संधी न मिळाल्याने संतापलेल्या नगरसेवकांनी ऐनवेळी माघार घेण्याचा पवित्रा घेतला. भाजपच्या या अंतर्गत यादवीमुळे काँग्रेसच्या वैशाली चंदनखेडे (झोन २) आणि रामनरेश यादव (झोन ३) यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. ज्या महापालिकेत भाजपची सत्ता येणे अपेक्षित होते, तिथे आता काँग्रेसने वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे.
या राजकीय घडामोडींमुळे चंद्रपूर भाजपमधील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील दरी अधिक रुंदावली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकांवर याचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भैरव दिवसे LS मराठी चंद्रपूर


