चंद्रपूर:- खाकी वर्दी परिधान करून पोलिस दलात सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून चंद्रपुरात आलेल्या एका २० वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १७) सकाळी तुकूम परिसरात उघडकीस आली. अर्पिता हरिदास वाकुलकर असे मृतक तरुणीचे नाव असून, ती मूळची मरेगाव (ता. मूल) येथील रहिवासी होती.
अर्पिता मागील दोन महिन्यांपासून तुकूममधील वाघोबा चौक परिसरात भाड्याने राहून पोलिस भरतीची तयारी करत होती. तिने नागपूर जिल्हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात यश न मिळाल्याने ती नैराश्यात होती, अशी चर्चा आहे. शुक्रवारी दि. १७ सकाळी बराच वेळ खोलीचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला असता, अर्पिताने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मृतदेहाजवळ एक 'सुसाईड नोट' सापडली. त्यात तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही दोष न देता, "कुटुंबाने मला खूप साथ दिली" असे नमूद केले आहे. बीए द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका उमद्या तरुणीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


