Accident News: रात्रीच्या वेळी काळाचा घाला; हळदी समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या व्यक्तीला ट्रकने चिरडले!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस मुख्यालय गेटसमोर मंगळवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वार व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात ४० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर चालक ट्रकसह फरार झाला आहे. मयत व्यक्तीचे नाव प्रदीप राजाराम सिडाम (वय ४० वर्षे, रा. जलनगर, चंद्रपूर) असे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप सिडाम हे एका हळदी समारंभाचा कार्यक्रम आटोपून रात्री १०:३० वाजताच्या सुमारास आपल्या MH 34 BW 8482 या दुचाकीने घराकडे परतत होते. दरम्यान, रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत, पोलीस मुख्यालयाच्या गेटसमोरील मुख्य रस्त्यावर मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक MH 34 BZ 8854) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.


या भीषण अपघातात प्रदीप सिडाम हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त समजताच रामनगर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी मयत प्रदीप सिडाम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून, अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. रामनगर पोलीस आता पळून गेलेल्या चालकाचा कसून शोध घेत असून, पुढील कारवाई सुरू आहे.