Fact Check: मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीची बातमी केवळ अफवा; राज्य सरकारकडून स्पष्टीकरण

Bhairav Diwase
मुंबई:- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले असून, अशा कोणत्याही नियुक्तीचा निर्णय झालेला नसल्याचे जाहीर केले आहे.


नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली होती.
रोहित पवार यांनी मागणी केली होती की, “महिला आयोगावर कोणत्याही राजकीय व्यक्तीची नियुक्ती न करता, मीरा बोरवणकर किंवा मेधा गाडगीळ यांच्यासारख्या अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.” या विधानानंतर सोशल मीडियावर मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. मात्र, एएनआय ने सुध्दा या वृत्ताचे खंडन केले आहे.


सध्या तरी महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्तच असून, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सरकार या पदावर कोणाची वर्णी लावणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.