Chandrapur News: विदर्भात सूर्याचा प्रकोप! जगातल्या १५ सर्वात उष्ण शहरांमध्ये ११ शहरे भारताची; चंद्रपूर-ब्रह्मपुरीचा समावेश!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- सध्या संपूर्ण विदर्भ आणि विशेषतः चंद्रपूर जिल्हा उष्णतेच्या भट्टीत शेकला जात आहे. परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येईल की, सध्या जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या १५ शहरांपैकी तब्बल ११ शहरे ही एकट्या भारतामधील आहेत! आणि अत्यंत चिंतेची बाब म्हणजे या ११ शहरांमध्ये आपल्या विदर्भातील शहरांचा भरणा सर्वाधिक असून, त्यात चंद्रपूर आणि ब्रह्मपुरीचा समावेश आहे.

आकडेवारीवर नजर टाकली तर, ब्रह्मपुरीचे तापमान तब्बल ४६.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर चंद्रपूरचा पारा देखील ४६.२ अंश सेल्सिअसवर गेला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.


भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही दिवसांत या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच २१ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी‌ 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. म्हणजेच नागरिकांनी अत्यंत तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे. तर २२ ते २४ मे दरम्यान काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) 'येलो अलर्ट' वर्तवण्यात आला आहे.


हवामान खात्याने नागरिकांना विनाकारण दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणे, सुती कपडे वापरणे आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे.