चंद्रपूर:- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षाने तडकाफडकी निलंबित केले असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्व देखील रद्द केले आहे.
Chandrapur Braking News: चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदार संघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांची माघार!
शैलेश अग्रवाल यांनी स्वतःच्याच विनंतीवरून काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळवली होती. मात्र, काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, पक्ष नेतृत्वाला आणि स्थानिक नेत्यांना संपूर्णपणे अंधारात ठेवून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांच्या या अनपेक्षित आणि धक्कादायक निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार अरुण लखानी यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला असून, राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची मोठी राजकीय नाचक्की झाली आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत काँग्रेस पक्षाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या थेट आदेशावरून, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी हे निलंबन पत्र जारी केले आहे. "शैलेश अग्रवाल यांनी पक्षाला अडचणीत आणून अत्यंत चुकीचे कृत्य केले आहे, त्यामुळे त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे," असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या पत्राच्या प्रती वर्धा, चंद्रपूर ग्रामीण, चंद्रपूर शहर आणि गडचिरोलीच्या जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांना देखील पाठवण्यात आल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारानेच घातलेला हा राजकीय दगाफटका आणि त्यानंतर काँग्रेसने केलेली ही मोठी कारवाई सध्या विदर्भाच्या राजकारणात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

