Sudhir Mungantiwar: वर्षभर आचारसंहिता असेल तर कामे कशी करायची? सुधीर मुनगंटीवारांचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल

Bhairav Diwase
चंद्रपूर:- वारंवार लागणाऱ्या निवडणुका आणि त्यामुळे विकासकामांना लागणारा आचारसंहितेचा ब्रेक, यावर राज्याचे ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आज चांगलेच कडाडले आहेत. "ही आचारसंहिता गाडून टाकली पाहिजे," अशा अत्यंत तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि वारंवार लागणाऱ्या आचारसंहितेवर थेट निशाणा साधला आहे. जर वर्षभर देशात आणि राज्यात आचारसंहिताच लागू राहणार असेल, तर लोकप्रतिनिधींनी आणि सरकारने जनतेची विकासकामे करायची कशी? असा रोकडा सवाल मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे. केवळ आचारसंहितेवरच न थांबता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही मोठे भाष्य केले आहे.


मुनगंटीवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्दच केल्या पाहिजेत, कारण याचा काहीही फायदा होत नाही," असे थेट मत त्यांनी मांडले आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसताना, इतर स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेणे हा ग्रामीण भागातील जनतेवर सरळ सरळ अन्याय असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


लोकशाहीतील लोकप्रतिनिधींच्या निवडीबाबत एक महत्त्वाची मागणीही त्यांनी केली आहे. "जर कोणाला आमदार व्हायचे असेल, तर त्यांनी थेट जनतेच्या दरबारातून, म्हणजेच थेट निवडणुकीतूनच निवडून आले पाहिजे," असे मुनगंटीवार म्हणाले. या संपूर्ण गंभीर विषयावर आणि निवडणूक पद्धतीतील बदलांविषयी ते लवकरच केंद्र सरकारला सविस्तर पत्र पाठवून दाद मागणार आहेत.