NEET Exam: पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त

Bhairav Diwase
परीक्षा केंद्रांवर असेल CISF चा पहारा!
चंद्रपूर:- उद्या देशभरासह चंद्रपूर जिल्ह्यात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' (NEET) परीक्षा पार पडणार आहे. यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील १० केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, एकूण ३ हजार ३०१ विद्यार्थी आपले नशीब आजमावणार आहेत. मात्र, गेल्या काही काळातील पेपरफुटीच्या घटना पाहता, यंदा जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कसर सोडलेली नाही. 


चंद्रपूर जिल्ह्यात उद्या होणाऱ्या नीट परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा परीक्षेची गोपनीयता आणि सुरक्षा राखण्यासाठी अभूतपूर्व पावले उचलण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कोणत्याही सामान्य मार्गाने नव्हे, तर थेट वायुदलाच्या (Air Force) विशेष विमानाने आधीच चंद्रपुरात आणण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या प्रश्नपत्रिका अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित ठिकाणी ठेवल्या असून, तिथे २४ तास कडा पहारा आहे. आज पोलीस प्रशासनाने उद्या होणाऱ्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थेची अंतिम चाचपणी म्हणजेच मॉक ड्रिल केले.


उद्याच्या नीट परीक्षेसाठी चंद्रपूर जिल्ह्यात आम्ही चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आणि केंद्रांवर असतील. याशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) जवान तैनात असणार आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र आणि वेगळी यंत्रणा उभारली असून आम्ही सुरक्षेची पूर्ण चाचपणी केली आहे.
:-ईश्वर कातकडे 
अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर 

पेपरफुटीचा कलंक पुसण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षा देता यावी, यासाठी प्रशासनाने ही तटबंदी उभारली आहे. १० परीक्षा केंद्रांवर स्थानिक पोलिसांसह CISF चे जवान तैनात असल्याने यंदा परीक्षा केंद्रांना छावणीचे स्वरूप आले आहे. आता विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित वातावरणात ठरण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.