Ballarpur Police: पीडित अल्पवयीन बालकांची ओळख सोशल मीडियावर उघड!

Bhairav Diwase
अमन अंदेवार याचेवर बल्लारपुर पोलीस स्टेशननी केला गुन्हा दाखल
बल्लारपूर:- लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन बालकांची ओळख आणि नावे व्हॉट्सअ‍ॅप प्रेस नोटद्वारे सोशल मीडियावर व पत्रकार ग्रुपवर प्रसारीत करून बालकांच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या अमन आनंद अंदेवार याच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


घटनेचा सविस्तर तपशील:

बल्लारपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप.क्र. ८१५/२०२६ (कलम ३५१ (२) बी.एन.एस. सहकलम ४, ६, १२ POCSO Act २०१२) या गुन्ह्यातील पीडित बालकांची ओळख उघड करणारी प्रेस नोट मो.क्र. ९५२७०२७३२२ वरून पत्रकार व इतर ग्रुप्सवर फिरत असल्याची गुप्त बातमीदाराकडून दि. ०६/०८/२०२६ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली.


तपासादरम्यान सदर मो. क्र. चा SDR काढला असता, तो मोबाईल क्रमांक अमन आनंद अंदेवार (रा. आंबेडकर वार्ड, बल्लारपूर) याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. अमन अंदेवार हा पोलीस ठाणे बल्लारपूर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.


कायद्याचे उल्लंघन आणि कारवाई: 

पोक्सो (POCSO) कायदा २०१२ अन्वये कोणत्याही पीडित बालकाची ओळख अथवा नाव कोणत्याही प्रसारमाध्यमावर किंवा सोशल मीडियावर उघड करण्यास सक्त मनाई आहे. आरोपीने जाणीवपूर्वक ही ओळख उघड करून बालकांची प्रतिष्ठा व सुरक्षितता धोक्यात आणल्याने, त्याच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात अप.क्र. ८२५/२०२६, कलम २३(४) पोक्सो कायदा २०१२ सह कलम ७४ बाल न्याय (बालकाची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस पथक:

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (राजुरा) सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, पोउपनि उमेश जोगदंड, पोहवा संतोष पंडित, तसेच पोलीस अंमलदार महेश कुकूडकर, मिलिंद आत्राम, फुलचंद लोधी, शांतकुमार घोसे व लखन चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.