चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील मालमत्ता क्र. २२९-३७६ संदर्भात श्री. मुन्ना विठ्ठल तावाडे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेकडे वारंवार निवेदने व पत्रव्यवहार करून महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निराधार आरोप केले असून, त्यामुळे महानगरपालिकेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिकेने संबंधित प्रकरणाची सखोल पडताळणी करून श्री. तावाडे यांना यापूर्वीच सविस्तर लेखी उत्तर दिले आहे. तसेच उपलब्ध अभिलेख, महसुली नोंदी व लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे संबंधित प्रकरणात महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने अतिक्रमण करून जागा बळकावलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर वाद हा खाजगी मालकी हक्क व ताब्यासंदर्भातील स्वरूपाचा असल्याने अशा प्रकरणात योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम न्यायालय अथवा सक्षम प्राधिकरणाचा आहे. त्यामुळे संबंधितांनी न्यायालयीन अथवा कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
तथापि, यानंतरही त्याच विषयावर वारंवार पत्रव्यवहार करून महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करणे, तसेच आत्मदहन किंवा टोकाचे पाऊल उचलण्याच्या धमक्या देणे हे कायदेशीर व प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य असल्याचे महानगरपालिकेने नमूद केले आहे.
महानगरपालिका नागरिकांच्या तक्रारींचे पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने निराकरण करण्यास कटिबद्ध असून, कोणत्याही व्यक्तीने निराधार आरोप करून किंवा चुकीची माहिती पसरवून महानगरपालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
