चंद्रपूर:- वर्धा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने तिचे बॅकवॉटर थेट इरई नदीत आले आहे. यामुळे इरई नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून चंद्रपूर शहराच्या बाह्य भागात पाणी शिरले आहे.
इरई नदीला आलेल्या पुरामुळे चोरळा आणि बिनबा गेट परिसराला जोडणारा मुख्य पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बिनबा गेट, रहमतनगर आणि लगतच्या सखल वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मनपा प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.
पुराचा मोठा फटका वाहतुकीला बसला असून जिल्ह्यातील तब्बल १६ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे, हजारो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना पुराच्या ठिकाणी न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

