Murder News: चंद्रपूर हादरले! जन्मदात्या वडिलांनी केली मुलाची हत्या

Bhairav Diwase
एक मुलाचा मृत्यू, दुसरा मुलगा जखमी
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाच्या भरात एका वडिलांनी आपल्याच दोन निष्पाप मुलांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात ७ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर ११ वर्षांचा मोठा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

घटनेचा सविस्तर तपशील:

दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मंगेश बदखल याच्या घरात कौटुंबिक कारणांवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मंगेशने घरातील धारदार शस्त्र काढून आपल्या दोन्ही निष्पाप मुलांवर अचानक हल्ला चढवला.
 
मृतक मुलगा: देवांश बदखल (वय ७ वर्षे)
 गंभीर जखमी मुलगा: सुशांत बदखल (वय ११ वर्षे)
आरोपी वडील: मंगेश बदखल


शस्त्राच्या गंभीर वारामुळे ७ वर्षीय देवांशचा जागीच मृत्यू झाला. तर ११ वर्षांचा सुशांत रक्ताच्या थारोळ्यात पडला.


पोलिसांची कारवाई व पुढील तपास:

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक, आणि गुन्हे शाखांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ गंभीर जखमी असलेल्या सुशांतला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. वडिल याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.