Jiwati News: रस्त्याअभावी गरोदर मातेचा बळी; दोन महिने उलटूनही प्रशासन सुस्त!

Bhairav Diwase
आदिवासी समाजानेच हाती घेतला रस्ता निर्मितीचा विडा!
चंद्रपूर:- स्वातंत्र्याची ७९ वर्षे उलटूनही दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी कसा संघर्ष करावा लागतो, याचे विदारक चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातून समोर आले आहे.


दोन महिन्यांपूर्वी घोडणकप्पी या दुर्गम गावात रस्ता आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. अखेर प्रशासकीय उदासीनतेला कंटाळून आणि भविष्यात कोणत्याही जिवाचा बळी जाऊ नये यासाठी आदिवासी समाजाने स्वतःच पुढाकार घेतला आहे.


जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत गोंदोलो सामुका यांच्या नेतृत्वाखाली घोडणकप्पी येथील सर्व आदिवासी बांधव एकत्र आले. कोणतीही शासकीय मदत न वाट पाहता, हातात टिकाव, फावडे आणि पाटी घेऊन नागरिकांनी स्वतःच रस्ता सुकर करण्याचे काम हाती घेतले. जागतिक आदिवासी दिन हा केवळ सण म्हणून साजरा न करता, आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी श्रमदान करून आदिवासी समाजाने प्रशासनाला जणू आरसा दाखवला आहे.


वारंवार अर्ज-विनंत्या करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या भागात रस्त्याची सोय केली नाही. २ महिने आधी गर्भवती महिलेचा रस्ता नसल्यामुळे मृत्यू झाला. अजून किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार? म्हणून आम्ही स्वतःच रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला. असू गावातील नागरिकांना म्हटले.


एकीकडे सरकार डिजिटल इंडिया आणि महामार्गांचे जाळे पसरवण्याच्या बाता मारत असताना, दुसरीकडे आरोग्य आणि रस्त्यासारख्या प्राथमिक सुविधांअभावी नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. घोडणकप्पीच्या या संघर्षाने प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता तरी या श्रमदानाची दखल घेऊन प्रशासन येथे पक्का रस्ता निर्माण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.