चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येने भयानक रूप धारण केले असून सर्वसामान्य नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. शहरातील तुकुम परिसरात एकाच मोकाट कुत्र्याने तब्बल ५२ नागरिकांना चावा घेतल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.
नागरिकांवर हातात काठी घेऊन फिरण्याची वेळ:
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात भटक्या कुत्र्यांची टोळकी वाढली आहेत. रस्त्यावरून चालताना किंवा घराबाहेर पडताना लहान मुले व वृद्धांना कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांना घराबाहेर पडताना हातात काठी घेऊन फिरावे लागत आहे.
मनपा प्रशासनाची 'नावालाच' कारवाई?
नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर मनपा प्रशासनाकडून कुत्रे पकडण्यासाठी वाहन पाठवले जाते. मात्र, पकडलेल्या कुत्र्यांना थोडे दूर नेऊन पुन्हा त्याच परिसरात आणून सोडले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढण्याची जोरदार मागणी होत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक:
या गंभीर समस्येकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेना (UBT) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी नगरसेवक सुरेश पचारे आणि युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त अकनूरी यांना निवेदन देण्यात आले व तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.
आयुक्तांच्या भूमिकेवर संताप:
निवेदन स्वीकारताना मनपा आयुक्त अकनूरी यांनी संबंधित भागातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यामुळे पुढे पालिका काही करू शकत नाही, असे उत्तर दिल्याचे आंदोलकांनी सांगितले. प्रशासनाच्या या बेजबाबदार आणि आडमुठ्या भूमिकेवर नागरिकांनी व आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
