warora News: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीची छेड

Bhairav Diwase

पोलिसांनी २४ तासांत एकाला ठोकल्या बेड्या!


वरोरा:- शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने छेडछाड करणाऱ्या आणि चालत्या गाडीवरून उडी मारायला लावणाऱ्या अज्ञात आरोपीला शेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. गणेश बाळूराम कुमावत (वय ३४, सध्या रा. बोर्डा, ता. वरोरा, मूळ रा. बासडी खुर्द, जि. जयपुर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास एक पीडित मुलगी शाळेत जात असताना एका दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले. काही अंतर पुढे गेल्यावर आरोपीने तिची छेड काढली. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने चालत्या गाडीतूनच उडी मारली, ज्यामुळे तिला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी दुचाकीसह घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (अपराध क्रमांक २५/२०२६, कलम ७४ बी.एन.एस. सह कलम १२ पोक्सो कायदा २०१२).


गुन्ह्यात आरोपीबाबत कोणतीही प्राथमिक माहिती उपलब्ध नसताना शेगाव पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केला. टेमुर्डा, वरोरा आणि परिसरातील तांत्रिक बाबींचा छडा लावत तसेच खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीचा शोध घेतला. कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे.


सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी (भा.पो.से.), अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार योगेंद्रसिंग यादव, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले, पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, साहाय्यक पोलीस फौजदार दिलीप सुर, पोलीस हवालदार अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार आणि पोलीस शिपाई प्रशांत गिरडकर यांनी पार पाडली.