Accident News: मूल-गडचिरोली महामार्गावर अपघात

Bhairav Diwase
एका युवकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

मुल:- मूल-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री साडेअकराच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्तावर अचानक जनावर आल्यामुळे भरधाव स्कॉडा कारवरील नियंत्रण सुटले आणि ही गाडी थेट शेतात घुसली. या दुर्दैवी अपघातात एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.


काल २७ सप्टेंबर २०२६ रात्री साडेअकराच्या सुमारास मूल-गडचिरोली महामार्गावर हा अपघात झाला. मरेगाव येथील 'एस. के. ढाबा'वरून जेवण करून एका स्कॉडा कारमधून (MH 49- CN- 1857) चार जण मूल शहराच्या दिशेने येत होते. मूल शहरालगत साई ढाब्यासमोर असलेल्या वळणावर अचानक रस्त्यावर एक जनावर आडवे आले. त्या जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालक सावन अनिल बुटे याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व जखमींना मूल येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात गाडीतील चारही जण गंभीर जखमी झाले होते:

१) सावन अनिल बुटे (वय ३३, रा. वार्ड क्र. १५, मूल) - वाहन चालक
२) राहुल राजू आगबत्तनवार (वय २८, रा. वार्ड क्र. १५, मूल)
३) प्रणय विलास शेटवार (वय २३, रा. हिंगणघाट, जि. वर्धा)
४) मंगेश सुरेश रोडे (वय ३५, रा. वार्ड क्र. १५, मूल)

यांपैकी मंगेश सुरेश रोडे यांना छातीला व कंबरेला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. इतर तिन्ही जखमींवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेमुळे मूल शहरात शोककळा पसरली आहे.