नागभीड:- गणपतीचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांच्या कारला एका अज्ञात वाहनाने (ट्रक) जोरदार धडक दिली. नागभीड ते ब्रह्मपुरी मार्गावरील कोरधा गावाजवळ घडलेल्या या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृत झालेल्यांमध्ये श्रावणी हिमेश बेदरे (वय १३, रा. विरली बुज, ता. लाखांदूर, जि. भंडारा) आणि नितीन उर्फ मिथुन विनायक भर्रे (वय ३५, रा. बोंडेगाव, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भर्रे आणि बेदरे कुटुंबीय गणपतीचे दर्शन घेऊन कार क्रमांक (MH 31 DC 9189) ने चंद्रपूरकडून ब्रह्मपुरीकडे जात होते. नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ त्यांची गाडी आली असता, मागून भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चुराडा झाला असून यात दोघांचा जीव गेला.
जखमींची माहिती:
या अपघातात इतर ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत:
ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल: हिमेश बेदरे (वय ४५), शौर्य हिमेश बेदरे (वय १०) आणि वैष्णवी नितीन भर्रे (वय ३२).
नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल: मैथिली हिमेश बेदरे (वय ३७) आणि अश्विनी नितीन भर्रे (वय ३०).
याप्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत असून, ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेमुळे बोंडेगाव आणि विरली परिसरात शोककळा पसरली आहे.
