पोंभुर्णा:- सध्या संपूर्ण राजुरा शहर हादरवून टाकणाऱ्या बहुचर्चित पापा जाधव हत्याकांडातील (Papa Jadhav Murder Case) एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या प्रकरणातील शस्त्रपुरवठा करणाऱ्या सहाव्या आरोपीला बेड्या ठोकण्यात राजुरा पोलिसांना यश आले आहे. संघटित गुन्हेगारीला पूर्णपणे मोडून काढण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणात आधीच 'मकोका'सारखा कठोर कायदा लावला असून, आता एकामागून एक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.
अंकित बापूजी मासीरकर (वय २४, रा. चुनाळा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर) असे अटकेतील या सहाव्या आरोपीचे नाव आहे. त्याने या सनसनाटी हत्येसाठी शस्त्र पुरवठा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
गत २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास राजुरा न्यायालय परिसरात विनोद ऊर्फ पापा जाधव याची अग्निशस्त्रातून गोळ्या झाडून भररस्त्यात निघृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
दरम्यान, हा गुन्हा एखाद्या संघटित गुन्हेगारी टोळीने केल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कठोर कलमे वाढवली. या संपूर्ण कटात अंकित मासीरकर याने शस्त्रपुरवठा केल्याची माहिती समोर आल्यापासून राजुरा पोलिस त्याचा कसून शोध घेत होती. अखेर रात्रीच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

