Action taken against DJ: पोलिसांच्या दणक्याने ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांचे धाबे दणाणले

Bhairav Diwase
चंद्रपूरात विनापरवाना डीजे आणि प्लाझ्मा जप्त 

चंद्रपूर:- शासकीय नियम आणि न्यायालयाच्या आदेशाला बगल देत विनापरवाना कर्णकर्कश आवाजात डीजे आणि प्लाझ्मा वाजविणाऱ्यांवर रामनगर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे खळबळ उडाली आहे.


चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाणे हद्दीत कोणतीही परवानगी न घेता उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स आणि कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केला जात असल्याची खात्रीशीर माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.


तपासणी केली असता, एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा साहित्य बसवून शासकीय नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले. यावेळी ऑपरेटर आणि वाहनचालकाकडे अधिकृत परवान्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.


 ट्रॅक्टर व ट्रॉली: ७,००,००० रुपये 

डीजे साऊंड सिस्टीम व प्लाझ्मा साहित्य: ५,५,००० रुपये

 एकूण जप्त मुद्देमाल: १२,५०,००० रुपये

ही धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकूरके यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी पार पाडली आहे.

सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या, विहित मर्यादेपेक्षा जास्त आवाजात साऊंड सिस्टीम किंवा प्लाझ्मा वाजविणाऱ्या आणि विनापरवाना डीजे चालविणाऱ्यांवर चंद्रपूर पोलीस दलातर्फे यापुढेही अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.