Chandrapur Fire News: चंद्रपुरात रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शहरातील अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. कॉम्प्लेक्समधील एका मेडिकल स्टोअरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

चंद्रपूर शहरातील आझाद बगिच्याजवळ असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील एका मेडिकल स्टोअरमध्ये आज पहाटे अचानक स्पार्किंग होऊन आग भडकली. देखते-देखते या आगीने अत्यंत रौद्ररूप धारण केले. कॉम्प्लेक्सच्या या भागात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुकाने असल्याने, आगीच्या ज्वाळा आणि प्रचंड धुरामुळे आजूबाजूच्या इतर दुकानांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग अधिक पसरू नये आणि आजूबाजूच्या दुकानांना तिचा विळखा बसू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर व शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी असून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.