चंद्रपूर:- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS) परिसरातून कॉपर केबल चोरी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा दुर्गापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या वाढत्या चोऱ्यांची गंभीर दखल घेत पोलिसांनी धडक कारवाई करत १० आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल २२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहदेव नारनवरे (वय ४०) यांनी सीएसटीपीएस परिसरात कॉपर केबल चोरीला गेल्याची तक्रार दुर्गापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
दरम्यान, दुर्गापूर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई फत्ते केली. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख २० हजार रुपये किमतीची ६ क्विंटल कॉपर वायर आणि चोरीचा हा माल वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेला १५ लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण २२ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या चोरीच्या रॅकेटमधील १० ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूरचे पोलीस निरीक्षक संतोष शेंगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर व प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन दुर्गापुर ठाणेदार संतोष शेंगावकर व पोलीस स्टेशन दुर्गापूरच्या गुन्हे शोध पथकाचे पोउपनि संदीप बच्छीरे, पोहवा राजु गोखरे, पोअं संदीप जाधव, सोनल खोब्रागडे, स्विखील उराडे, कोमल मोहजे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

