चिमूर:- चिमूर नगर परिषदेने शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात नव्याने सुरू केलेल्या शिवार हाट बाजारात दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भाजी विक्रीच्या कारणावरून दोन गटांतील भाजी विक्रेत्यांमध्ये वाद विवाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूने सपासप वार केल्याने दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
या घटनेमुळे शिवार हाट बाजार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत गणेश देवराव लोथे (३५) आणि नितेश देवराव लोथे (३२) हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. वाद शांत झाल्यानंतर दोन्ही जखमींनी रक्त बंभाळ अवस्थेतच दुचाकीने तातडीने चिमूर पोलीस ठाणे गाठून संबंधितां विरुद्ध तक्रार. दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपी प्रज्वल महेश रासेकर (२२) आणि दिपक केशव साखरकर (३०) यांच्या विरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे दाखल केले. उपचारा दरम्यान नितेश लोथे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलीस करीत आहेत.

