सावली:- तालुक्यातील केरोडा येथे झोपेत असताना मण्यार जातीच्या विषारी सापाने झाल्याची दंश केल्याने २५ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे घडली. वैभव भगवान कोमलवार, (२५), रा. केरोडा, ता. सावली असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेने केरोडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामीण भागात सर्पदंशाचा वाढता धोका पुन्हा एकदा वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे.
दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री वैभव हा घरात झोपलेला असताना त्याला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी वेळ न दवडता त्याला उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सर्पविषाचा परिणाम गंभीर झाल्याने उपचारादरम्यान रविवारी दि. २० सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता वैभवचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वैभव हा शेतकरी कुटुंबातील युवक होता. त्याच्या पश्चात एक भाऊ असून, आई-वडिलांचे छत्र यापूर्वीच हरपले आहे. दोन्ही भाऊ अविवाहित असून मजुरी करून आपल्या उदरनिर्वाहाचा गाडा चालवत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवन जगत असतानाच वैभवचा सर्पदंशाने झालेला अकाली मृत्यू कुटुंबासाठी मोठा आघात ठरला आहे.
कुटुंबातील कर्त्या हातांपैकी एक हात अचानक निघून गेल्याने त्याच्या भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता असते. सध्या पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने सापांचा मानवी वस्तीकडे होणारा वावर वाढतो. पावसाचे पाणी बिळांमध्ये शिरल्यानंतर साप सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. अशावेळी घरालगत असलेला कचरा, गवत, झुडपे, लाकूडफाटा तसेच पडून असलेल्या वस्तू त्यांच्यासाठी लपण्याची सुरक्षित ठिकाणे ठरतात. परिणामी शेतीच्या बांधालगत किंवा मोकळ्या जागांच्या शेजारी असलेल्या घरांमध्ये विषारी साप शिरण्याचा धोका निर्माण होतो.
