चंद्रपूर:- जिल्ह्यातील औद्योगिक विकास, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. पोलीस सभागृह, तुकुम रोड, चंद्रपूर येथे नुकतीच जिल्ह्यातील विविध कंपन्या, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) आणि औद्योगिक आस्थापनांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच जिल्ह्यातील सुमारे १०० औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत औद्योगिक परिसरातील सुरक्षा, भंगार चोरी, कामगारांचे विमा संरक्षण, वाहतूक व्यवस्था आणि बेकायदेशीर मागण्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, उद्योगांना सुरक्षित वातावरण देणे आणि कामगारांचे हित जोपासणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. कंपन्यांवर बेकायदेशीर दबाव आणणाऱ्या किंवा खंडणी मागणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला.
