चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात सामाजिक सलोखा आणि एकातेचे सुंदर दर्शन पाहायला मिळाले. निमित्त होते 'जय श्री राम' गणेश मंडळाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय महाआरतीचे! भाजप आमदार देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून मागील १० वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाने यंदाही सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेतले.
घुग्घुस शहरात आयोजित या सर्वधर्मीय महाआरतीला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. या विशेष सोहळ्यात हिंदू बांधवांसह मुस्लिम, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या उपक्रमाचे खुलेपणाने कौतुक केले. "धर्म वेगवेगळे असले तरी आपला भाव एकच आहे," असे सांगत त्यांनी, सर्वधर्मीय बांधवांनी एकत्र येऊन केलेली ही महाआरती समाजात एकता, सलोखा आणि बंधुभावाचा एक शक्तिशाली संदेश देत असल्याचे म्हटले.
गेल्या एका दशकापासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम घुग्घुस शहरात सर्वधर्म समभावाचे एक प्रतीक बनला असून, या महाआरतीमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
