चंद्रपूर:- शहरात अवैधरित्या गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर रामनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीच्या घरावर छापा टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या तीन गोवंशांची सुटका केली असून, सुमारे ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहरात अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिले होते. या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला कडक कारवाईचे आदेश दिले होते.
दरम्यान, रामनगर पोलिसांच्या शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रय्यतवारी कॉलरी येथील डिस्पेंसर चौक परिसरातील अब्दुल गणी शेख ईस्माईल कुरेशी (वय ४९ वर्षे) याने आपल्या घरात अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश डांबून ठेवला असून तो त्यांची कत्तल करून गोमांस विकत आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पंचांना सोबत घेऊन १८ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित आरोपीच्या घरी धाड टाकली. या छाप्यादरम्यान घरातून गोमांस, वजनकाटा, सत्तुर, लाकडी कुंडा तसेच कत्तलीसाठी आणलेले दोन गाई व एक गौरा (असे एकूण तीन गोवंश) मिळून आले. पोलिसांनी ९३,८००/- रुपये किमतीचा ऐवज जप्त केला असून, आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काककडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

