Chandrapur News: चंद्रपुरात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश

Bhairav Diwase
वृंदावन नगर परिसरात कारवाई; ५१ सिलेंडर जप्त
चंद्रपूर:- शहरातील वृंदावन नगर परिसरात सुरू असलेल्या एका अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर आम आदमी पार्टी, पोलीस आणि अन्नधान्य पुरवठा विभागाने संयुक्त धाड टाकून मोठा गोरखधंदा उघडकीस आणला आहे. एका टिनच्या गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या या अवैध प्रकारात भरलेल्या सिलेंडरमधून गॅस काढून तो रिकाम्या सिलेंडरमध्ये भरला जात असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत तब्बल ५१ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, यामध्ये ४३ घरगुती आणि ८ व्यावसायिक सिलेंडरचा समावेश आहे.

कसा चालत होता हा काळा बाजार?

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सींमधून ग्राहकांच्या घरांपर्यंत पोहोचण्यासाठी निघणाऱ्या गाड्या थेट या अवैध अड्ड्यावर येत होत्या. विशेष नोझलच्या साहाय्याने भरलेल्या सिलेंडरमधील गॅस काढून तो दुसऱ्या सिलेंडरमध्ये ओतला जात असे. या धोकादायक प्रकारामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सिलेंडरमध्ये तब्बल दोन ते अडीच किलोपर्यंत गॅस कमी मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


‘आप’च्या सतर्कतेमुळे प्रकार उजेडात:

या परिसरातील संशयास्पद हालचालींवर आम आदमी पक्षाच्या (AAP) पदाधिकाऱ्यांनी काही काळ पाळत ठेवली होती. खात्री पटल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस आणि अन्नधान्य पुरवठा विभागाला यांना माहिती दिली, त्यानंतर ही संयुक्त धाड टाकण्यात आली.


जप्त करण्यात आलेले हे सर्व सिलेंडर 'गोपिका इंडेन गॅस एजन्सी'शी संबंधित असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटमध्ये संबंधित गॅस एजन्सीच्या वाहनांचा आणि कर्मचाऱ्यांचा नेमका सहभाग किती आहे, याचा सखोल तपास आता प्रशासनाकडून केला जात आहे.

सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर:

अशा प्रकारे मानवी वस्तीत किंवा गोडाऊनमध्ये नियम डावलून गॅस रिफिलिंग करणे अत्यंत धोकादायक आहे. गॅस गळती किंवा अचानक आग लागल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अवैध प्रकार शहरात मागील किती दिवसांपासून सुरू होता आणि यामागे नेमके कोणते मोठे मासे आहेत, हे पोलीस तपासातून समोर येणार आहे.


कारवाईत सहभागी अधिकारी व पदाधिकारी:
 अन्नधान्य पुरवठा विभाग: सुमित चवरे (अन्नधान्य पुरवठा अधिकारी, चंद्रपूर), अमित खडतकर, अरविंद शेंडे

आम आदमी पार्टी (आप): सुनील मुसळे (प्रदेश सचिव), मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष), योगेश गोखरे (महानगर अध्यक्ष), संतोष बोपचे (संघटन मंत्री) व इतर पदाधिकारी.