चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यांतर्गत येणाऱ्या नगराळा गावातील अमृत नाईक खाजगी आश्रमशाळेत एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारी जेवणात दिल्या गेलेल्या वरणाच्या भांड्यात पाल पडल्याने मोठी विषबाधा झाली. या दुर्दैवी घटनेत ३१ विद्यार्थी बाधित झाले असून त्यांना तातडीने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जेवणानंतर अचानक विद्यार्थ्यांच्या पोटात दुखणे, तीव्र मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. हा प्रकार लक्षात येताच शाळा प्रशासनाकडून उपचाराची हलचल वेगाने करण्यात आली. प्राथमिक उपचारानंतर सर्व ३१ विद्यार्थ्यांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, तेथे सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही. आज या सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे आश्रमशाळेतील अन्न सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
