चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात नळाच्या पाण्यात चक्क जिवंत तीन 'नारू' आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांना घरगुती वापरासाठी आणि पिण्यासाठी नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात जिवंत नारू आढळल्यामुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या स्वच्छतेवर आणि कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिण्याच्या पाण्याचा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंध असतो, मात्र प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे घुटकाळा वार्डातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेऊन पाणीपुरवठा यंत्रणेची कसून तपासणी करावी आणि नागरिकांना तातडीने स्वच्छ व सुरक्षित पाण्याचा पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी आता चंद्रपूरकरांकडून केली जात आहे. मनपाचा पाणीपुरवठा विभाग यावर काय पावले उचलतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

