Ganpati Visarjan : चंद्रपुरात सकाळपासून रिमझिम पाऊस

Bhairav Diwase
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट!

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. एकीकडे लाडक्या बाप्पाला निरोप देण्याच्या अनंत चतुर्दशीच्या उत्साहात शहर दुमदुमले असतानाच, दुसरीकडे या पावसामुळे विसर्जन मिरवणुकीवर काही प्रमाणात सावट निर्माण झाले आहे.



शहरातील विविध भागांत सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची संततधार सुरू आहे. लाडक्या गणरायाला निरोप देताना विघ्न येऊ नये म्हणून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असला, तरी मिरवणुकीदरम्यान हा पाऊस असाच कायम राहणार का, याबद्दल गणेश मंडळे आणि नागरिकांमध्ये चिंता व उत्सुकता दोन्ही पाहायला मिळत आहेत.


चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोणत्याही अघटित प्रकाराशिवाय आणि सुरळीतपणे विसर्जन पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पावसामुळे कुठलाही अडथळा येऊ नये, अशीच प्रार्थना चंद्रपूरकर लाडक्या बाप्पाकडे करत आहेत.