DJ : विनापरवाना डीजे वाजविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

Bhairav Diwase
राजुरा:- शहरातील नवीन बस स्टॉपसमोर विनापरवाना आणि उच्च आवाजात डीजे साऊंड सिस्टीम वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर राजुरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. १४ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत एका बोलेरो पिकअप वाहनावर (क्र. MH-34-BZ-5017) कारवाई केली.


तपासणीदरम्यान वाहनचालक व मालकाकडे डीजे वाजवण्याबाबत कोणतीही अधिकृत परवानगी किंवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. शासकीय आदेशाचे उल्लंघन आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी साऊंड सिस्टीम आणि वाहन असा एकूण १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७३०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम ३८ व १३६ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताब्यात घेतलेले आरोपी:

१. रवी सतीश एकनकर (वय २८ वर्षे, व्यवसाय: डीजे मालक/ऑपरेटर, रा. फुलसिंग नाईक वार्ड, बल्लारशाह)

२. सचिन इन्चुलाल सरोज (वय २२ वर्षे, व्यवसाय: चालक, रा. पंडित दीनदयाल वार्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपूर)


जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील:
 डायनॉटीक कंपनीचे २ साऊंड टॉप (किंमत अंदाजे ११,०००/- रुपये)
 क्रीश कंपनीचे ४ साऊंड बेस (किंमत अंदाजे १२,०००/- रुपये)
 क्राउन कंपनीची १ मशीन (किंमत अंदाजे १४,०००/- रुपये)
 कॉईनर कंपनीचा १ मिक्सर (किंमत अंदाजे १,२०,०००/- रुपये)
 किर्लोस्कर कंपनीचा १ जनरेटर (किंमत अंदाजे ११,०००/- रुपये)
 महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-34-BZ-5017 (किंमत अंदाजे ८,००,०००/- रुपये)
 एकूण जप्त मुद्देमाल: १२,६०,०००/- रुपये

सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी पार पाडली. 


राजुरा पोलिसांच्या या कारवाईमुळे विनापरवाना डीजे चालकांमध्ये खळबळ उडाली असून, भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.