Lightning in Chandrapur district: चंद्रपूर जिल्ह्यात वीजेचा कहर

Bhairav Diwase
दोन घटनांत दोघांचा मृत्यू, महिला गंभीर

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसादरम्यान वीजेने अक्षरशः कहर केला आहे. पोंभूर्णा आणि मूल तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये वीज पडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.


पहिली घटना पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे घडली. येथे केशव डोनु गुडी हे शेतातील काम आटोपून आपल्या पत्नीसह घरी परतत होते. यादरम्यान त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत केशव गुडी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी वैशाली गुडी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


दुसरी घटना मूल तालुक्यातील उसराळा येथे घडली. येथे दीपक नारायण मडावी (वय ३५ वर्ष) हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेले होते. यादरम्यान आलेल्या अचानक वादळी पावसात त्यांच्यावर वीज कोसळली आणि या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.


अचानक आलेल्या या वादळी पाऊस आणि वीज कोसळण्याच्या सत्रामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने दोन कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.