राजुरा:- शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आणि धैर्य वाढवण्याच्या उद्देशाने राजुरा येथील शिवाजी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा समारोप अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
राजुरा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये दिनांक २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान हे विशेष शिबिर पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक गजानन एस. खामनकर यांनी भूषवले. या शिबिराला राजुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि चंद्रपूर येथील भरोसा सेल तथा दामिनी पथक प्रमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या तीन दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे विविध तंत्र, संकटाच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, कायदेविषयक माहिती आणि सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास न ठेवता, अडचणीच्या प्रसंगी योग्य व्यक्तीची मदत घेण्याचे आवाहन केले. तर प्रज्ञा वाडेकर यांनी पॉक्सो कायदा (POCSO Act), अमली पदार्थ विरोधी कायदे आणि सायबर सुरक्षेविषयी सखोल माहिती देत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी कराटे प्रशिक्षक प्रवीण रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेली स्वसंरक्षणाची अचूक प्रात्यक्षिके आणि कवायत! या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली. तसेच, विद्यार्थ्यांना गुन्ह्यांपासून सतर्क राहण्यासाठी आणि जनजागृतीपर व्हिडिओ पाहण्यासाठी 'सुरक्षा मंत्र' हे विशेष पुस्तक व त्यातील क्यूआर कोडची (QR Code) माहिती देण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक गजानन खामनकर यांनी स्वसंरक्षण म्हणजे केवळ शारीरिक शिक्षण नसून ती सतर्कता आणि आत्मविश्वास वाढवण्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस विभाग, भरोसा सेल, दामिनी पथक आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले.

