Chandrapur News: त्याच घरी, तोच नळ… पुन्हा आढळले जिवंत दोन ‘नारू’!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर शहरातील घुटकाळा वॉर्डातील आंबेकर ले-आऊटमध्ये नळाच्या पाण्यात पुन्हा एकदा जिवंत ‘नारू’ आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात काही दिवसांपूर्वी नळाच्या पाण्यात तीन जिवंत नारू आढळले होते. त्यानंतर तक्रार करूनही पुन्हा त्याच घरातील नळाच्या पाण्यात दोन जिवंत नारू आढळल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आंबेकर ले-आऊट परिसरातील नागरिकांना घरगुती वापरासह पिण्यासाठी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या पाण्यातच जिवंत नारू आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्याची स्वच्छता आणि गुणवत्ता ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असताना अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


काही दिवसांपूर्वी याच परिसरात नळाच्या पाण्यात तीन जिवंत नारू आढळल्यानंतर अरविंद वाढई यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंबेकर ले-आऊटमध्ये जाऊन पाण्याचे नमुने घेतले आणि ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. तसेच, योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.


मात्र, त्या घटनेनंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नसून आता पुन्हा त्याच ठिकाणी नळाच्या पाण्यात दोन जिवंत नारू आढळले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने घेतलेले नमुने, त्यांची तपासणी आणि त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजना नेमक्या कुठे आहेत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


तक्रारीनंतरही समस्या कायम; मग उपाययोजना झाल्या कुठे?

नागरिकांच्या घरात थेट पोहोचणाऱ्या पाण्यात वारंवार जिवंत नारू आढळत असतील, तर पाणीपुरवठा यंत्रणेची स्वच्छता, जलवाहिन्यांची स्थिती आणि पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी याबाबत मनपाकडून नेमकी कोणती काळजी घेतली जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


एकदा घटना समोर आल्यानंतर नमुने घेऊन तपासणी करणे आणि उपाययोजनांचे आश्वासन देणे पुरेसे आहे का? पुन्हा त्याच नळातून जिवंत नारू आढळत असतील, तर प्रशासनाच्या उपाययोजनांचा परिणाम नेमका काय झाला? असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.


नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको!

पिण्याचे पाणी हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित विषय आहे. त्यामुळे अशा प्रकाराकडे केवळ किरकोळ घटना म्हणून पाहण्याऐवजी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोष शोधणे आणि नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पाणी मिळेल याची खात्री करणे गरजेचे आहे.


नळातून पाणी येतेय की आरोग्याचा धोका? असा सवाल आता घुटकाळा वॉर्डातील नागरिक विचारत आहेत. वारंवार तक्रारी आणि प्रत्यक्ष घटनांनंतरही समस्या कायम राहत असेल, तर महानगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले जाणे स्वाभाविक आहे.


नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर महानगरपालिका प्रशासन आता तरी जागे होणार का, आणि आंबेकर ले-आऊटमधील दूषित पाणीपुरवठ्याचे मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.