Chandrapur police : पार्किंगमधील दोन कारचे आठ टायर अलॉयव्हीलसह लंपास; विधीसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूरमध्ये पार्किंग करून ठेवलेल्या कारचे चाक चोरणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, तब्बल एक लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर शहरातील नागपूर रोड परिसरात कारचे टायर चोरीला जाण्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या.

पहिल्या घटनेत, तक्रारदार भूषण नारायणराव गवांडे यांनी त्यांच्या गॅरेजसमोर पार्किंग करून ठेवलेल्या मारुती सुझुकी ब्रेझा कारचे चारही टायर अलॉयव्हीलसह अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते.

तर दुसऱ्या घटनेत, कुंदन प्लाझा चौकातील ए. वन कार वॉशिंग सेंटरसमोर उभ्या असलेल्या बलेनो कारचेही चारही टायर अलॉयव्हीलसह चोरीला गेले होते.

या दोन्ही प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान हवेली गार्डन परिसरातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी संबंधित बालकाला त्याच्या पालकांसमक्ष ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ टायर अलॉयव्हीलसह, चोरीसाठी वापरलेली मोपेड दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा जॅक असा एकूण एक लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे रामनगर पोलिसांनी चोरीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.


वरील कारवाई ही पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.