Chandrapur police : सण-उत्सव आणि निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
जिल्ह्यात श्रावण मास, नागपंचमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, बैलपोळा-तान्हापोळा, गणेशोत्सव, मसक-या गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ऐतिहासिक दसरा मेळावा, रावण दहन, श्री माता महाकाली महोत्सव तसेच नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक या सलग सण-उत्सव आणि महत्त्वाच्या बंदोबस्त कार्यक्रमांच्या काळात चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने २४ तास सजग राहून कडेकोट बंदोबस्त तैनात केला. 

पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी पोलीस अधिकारी, विविध शाखेचे पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस अंमलदारांसह गृहरक्षक दलातील अधिकारी व अंमलदारांच्या प्रभावी नियोजनातून संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश आले आहे.


विविध सण-उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्वतयारीवर विशेष भर दिला. यात गणेश मंडळांच्या ५०, शांतता समितीच्या ४५, मोहल्ला कमिटीच्या २१, पोलीस मित्रांच्या २४, नागरिक समन्वय समित्यांच्या २६ तसेच विविध शासकीय विभागांसोबत ३५ अशा एकूण २०० हून अधिक महत्त्वपूर्ण बैठका घेण्यात आल्या. आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी संवेदनशील पोलीस ठाण्यांत दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम (मॉकड्रिल) घेण्यात आली, तर १३ पोलीस ठाण्यांमधील दंगल नियंत्रण साधनसामग्रीची काटेकोर तपासणी करण्यात आली.


या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान कायदा, सुव्यवस्था आणि शांतता अधिक प्रभावीपणे अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने एक अत्यंत दूरगामी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. महाराष्ट्र राज्यात प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यात 'एक गणेश मंडळ' एक पोलीस अंमलदार' (One Ganpati Mandal, One Amaldar) ही संकल्पना प्रत्यक्ष जमिनीवर यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या उपक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि उत्साहात पार पडला.


चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी एकूण १५,७०० गणेशमूर्तीची (२, २१३ सार्वजनिक व १३,४८७ खाजगी) स्थापना करण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्सव असतानाही 'एक गणेश मंडळ' एक पोलीस अंमलदार' या मॉडेलमुळे अनंत चतुर्दशीसह सर्व दिवसांचे विसर्जन अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडले. चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी एकूण ८५७ मसक-या गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्यांचेही विसर्जन अत्यंत शांततेत पार पडले.

सण-उत्सव व गर्दी व्यवस्थापनः

श्री. गणेशोत्सवः जिल्ह्यात २,२१३ सार्वजनिक आणि १३,४८७ खाजगी अशा एकूण १५,७०० मूर्तीची स्थापना झाली. १५ दिवस चाललेल्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. इरई नदी, दाताळा रोड व मामा तलाव (वरोरा) येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.

शारदीय नवरात्रोत्सवः ३,७५५ हून अधिक दुर्गा व शारदा मूर्ती तसेच ४८ दांडिया रास आयोजनांवर सीसीटीव्ही, तात्पुरते वॉच टॉवर आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष 'दामिनी पथके' व गस्त तैनात करण्यात आली.

श्री. माता महाकाली महोत्सवः पालखी प्रदक्षिणा व महाआरतीदरम्यान सुमारे ३० ते ४० हजार भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग व गर्दी नियंत्रण मार्गाचे प्रभावी नियोजन करण्यात आले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनः दीक्षाभूमी येथे आयोजित पवित्र अस्थिकलश रॅलीत ८ ते १० हजार नागरिक, तर मुख्य सोहळ्यासाठी सुमारे २.५ ते ३ लाख अनुयायी उपस्थित होते. या प्रचंड गर्दीच्या सुरक्षेसाठी २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १५ पोलीस निरीक्षक, ६६ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ७६७ पोलीस अंमलदार व १०४ वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ड्रोन देखरेख, अखंडित व्हिडिओग्राफी व दंगल नियंत्रण पथकांद्वारे कडक नजर ठेवण्यात आली.


'AI CCTV सर्व्हेलन्स व्हॅन' या सर्व सण-उत्सव, भव्य मिरवणुका, महामेळावे आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने पारंपरिक बंदोबस्ताला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमतःच 'AI CCTV सर्व्हेलन्स व्हॅन' (आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित फिरती निगराणी व्हॅन) प्रत्यक्ष बंदोबस्तात तैनात करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी, मिरवणूक मार्गावर आणि संवेदनशील भागांमध्ये समाजकंटक, सराईत गुन्हेगार व संशयितांवर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी या अत्याधुनिक व्हॅनचा प्रभावी वापर करण्यात आला.


गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका, नवरात्रोत्सव, मोठ-मोठ्या गरबा उत्सवात, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि पदवीधर निवडणुकीच्या काळात या AI CCTV सर्व्हेलन्स व्हॅनमुळे मानवी डोळ्यांना गर्दीत न दिसणाऱ्या बारीक-सारीक हालचालींवर तंत्रज्ञानाने अचूक मात केली.

यावर्षी नियमांचे उल्लंघन करणारे १ गणेश मंडळ आणि ४ दुर्गा/शारदा देवी मंडळाविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.


गुन्हेगार व समाजकंटकांवर कठोर कारवाईः

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गणेशोत्सवात BNSS विविध कलमान्वये ३,८२६ व्यक्तींवर आणि नवरात्रोत्सवात २,८१२ व्यक्तींवर अशी एकूण ६,६३८ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवात १७६१ इसमांविरुध्द ४ दिवसांकरीता तडीपार ची कारवाई करण्यात आली. तसेच सराईत गुन्हेगारांवर सुध्दा तडीपारी, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि एमपीडीए (MPDA) अन्वये कडक प्रस्ताव दाखल करण्यात आले.

बेकायदेशीर डीजे वाजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

माननीय न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून विनापरवाना व कर्णकर्कश डीजे वाजविणाऱ्यांवर दुर्गापूर, राजुरा, रामनगर, मूल व सिंदेवाही, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यांत एकुण १५ गुन्हे दाखल करुन २,९२,७१,०००/- रुपयाची डीजे साहित्य, जनरेटर, प्रेशर मिड्स व वाहने अशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत चोख सुरक्षाः

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३२,२६२ मतदारांकरिता ३० इमारतींमधील ५८ मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक सुरक्षा सुनिश्चित करून १९ पोलीस ठाण्यांची गस्त पथके, २१ स्थिर सर्वेक्षण पथके (SST), १७ भरारी पथके (FST) आणि १३ व्हिडिओ सर्वेक्षण पथके (VST) २४ तास कार्यरत होती. सुरक्षेचा उपाय म्हणून ३३७परवानाधारक शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

नागरिकांचे व उत्सव मंडळांचे आभारः

सलग सण-उत्सव व निवडणुकीच्या अत्यंत संवेदनशील काळात कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करत पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील सजग नागरिक, शांतता समितीचे सदस्य, उत्सव मंडळे, पोलीस मित्र, विविध समाज-स्वयंसेवी संगठन विविध शासकीय विभाग आणि माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानुन भविष्यात देखील नागरीकांनी अशाच प्रकारे पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.