नागभीड:- पावसाच्या लहरीपणाचा आणि अपुऱ्या पावसामुळे झालेल्या धान पिकाच्या नुकसानीने एका शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे पिकाच्या चिंतेतून एका शेतकऱ्याने गावातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
मुखरू लक्ष्मण दडमल (वय ६० वर्ष) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्याकडे दीड एकर धानाची शेती होती. यंदा पावसाअभावी शेतातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने मुखरू दडमल गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात आणि चिंतेत होते.
आज (दि. ११) याच नैराशातून त्यांनी गावातील तलावात उडी घेतल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलाव परिसरात मोठी गर्दी केली. प्रशासनाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या मदतीने तलावात बुडालेल्या या शेतकऱ्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


